जिभेच्या वापराची तंत्रे

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

बासरी वाजवताना बोटांची हालचाल सर्वांत जास्त दिसते. जिभेचा आणि फुंकरीचा वापर कमी दिसतो, पण तितकाच महत्त्वाचा असतो. इथे जिभेच्या तंत्रांचा विचार करूया.

अखंड स्वरात खंड पाडणे हा जिभेच्या वापराचा उघड उद्देश आहे. त्या खंडांना वेगवेगळे रंग देणे हा कमी स्पष्ट उद्देशही आहे.

हे जगभरातील इंग्रजीच्या लहेजांसारखे आहे. तेच वाक्य इंग्रज, भारतीय किंवा अमेरिकी व्यक्तीने म्हटले, तर फरक ओळखू येतो. प्रत्येक लहेजा मूळ वाक्यात किती विविधता आणतो, हे लक्षात घ्यायचे. संगीतही अशा विविधतेने समृद्ध होते.

समजा, जिभेने स्वरात खंड पाडायचा आहे. आधी एक लांब, अखंड स्वर वाजवा. मग नियमित लयीत “र र” म्हणत तो तोडा. त्याच लयीत “त त” म्हणा. आता “त र त र” एकत्र करा. मग “क” आणि नंतर “प” वापरा.

काय लक्षात आले? खंडाची वेळ आणि रचना अगदी तीच असूनही प्रत्येक अक्षराने आवाज वेगळा होतो.

हे आणखी समजून घेण्यासाठी टायगरमधला “ट” म्हणा. तेव्हा जीभ तोंडाच्या वरच्या भागाला लागते. आता तालमधला “त” म्हणा. तेव्हा जीभ पुढच्या दातांना लागू शकते.

बासरीवर लांब स्वर वाजवून आधी “ट”, मग “त” वापरून खंड पाडा. आता जिभेचा स्पर्श पुढच्या दातांपासून तोंडाच्या आत हळूहळू सरकवा. प्रत्येक खंडातून तयार होणारे लहेजे ऐका. काही ठळक असतील, तर काही अतिशय सूक्ष्म.

जिभेच्या वापरामागची मूलभूत कल्पना हीच: वेगवेगळी अक्षरे वापरून विविध परिणाम घडवता येतात. फरक सूक्ष्म असले तरी एकूण सादरीकरण समृद्ध होते.

जिभेच्या तंत्रांचे काही विशिष्ट उपयोग

ध्रुपद शैलीत जिभेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उदाहरणार्थ, जोड आलापात लयीची स्पंदने निर्माण करण्यासाठी हे तंत्र वापरतात.

आता बहुधा दुर्लक्षित राहणारा पैलू. बोटांप्रमाणे जिभेवरही लयीचे नियंत्रण असले पाहिजे. वरची सर्व अक्षरे लयीत म्हणता आली पाहिजेत. यासाठी सराव हवा. मेट्रोनोम किंवा इलेक्ट्रॉनिक तबल्याने ठेका ठरवून त्याच्याशी जिभेची हालचाल स्वच्छपणे जुळवण्याचा प्रयत्न करा.

जिभेच्या वापराचा एक खास प्रकार म्हणजे फ्लटर टंगिंग. झाल्याचा परिणाम निर्माण करण्यासाठी तो खूप वापरला जातो. यात “तु-कु-तु-कु-तु…” अतिशय वेगाने पण लयीत म्हटले जाते.

शेवटी जिभेचा आणि बोटांचा वापर एकत्रही करता येतो. जलद गतीत हे विशेष कठीण असते, कारण दोन्हींचा अगदी अचूक समन्वय आवश्यक असतो.