योग्य पकड

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

पुढचा टप्पा म्हणजे बासरी योग्य धरायला शिकणे आणि एकेक छिद्र बंद करणे. आधी सर्व छिद्रे उघडी ठेवून आवाज काढला होता. आता ती क्रमाने बंद केल्यावर वेगवेगळे स्पष्ट स्वर मिळतील.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक हाताची छिद्रे झाकणारी तीन बोटे वेगाने हलण्यासाठी मोकळी असावीत. बासरी पकडण्यासाठी ती वापरू नका किंवा तिच्याभोवती आवळू नका. ती शक्य तितकी हलकी राहावीत. वरच्या हाताच्या तर्जनीने बासरी जखडणे ही नेहमीची चूक आहे. वाजवणारी बोटे पकडण्यात गुंतली, तर ती वेगाने हलणार नाहीत आणि वादनाचा वेग कमी होईल.

पुढे जाण्याआधी सांगतो: खालील मांडणी हा पकडीविषयी माझा दृष्टिकोन आहे. या विषयावर अनेक ठाम मते आणि प्रतिमते आहेत. तीही तुम्ही पाहू शकता.

बासरीच्या पकडीचे आधारबिंदू

बासरी तीन आधारबिंदूंवर स्थिर राहावी:

  1. हनुवटी.
  2. वरच्या हाताचा अंगठा, जो बासरी हनुवटीकडे दाबतो.
  3. खालच्या हाताचा अंगठा, जो तोल सांभाळतो.

दोन्ही हातांची अनामिका आणि करंगळी अधिक नियंत्रण देऊ शकतात; पण पकडण्यासाठी आवळू नयेत. वरचा अंगठा पहिल्या छिद्रापासून सुमारे एक इंचावर दाब देतो. खालचा अंगठा चौथ्या-पाचव्या छिद्रांच्या मध्ये, छिद्रांपासून साधारण 90 ते 120 अंशांवर असावा.

आता आवाज काढता येत असल्यामुळे पुढचे पाऊल टाका. सर्व छिद्रे उघडी ठेवून योग्य पकडीत बासरी वाजवा. आधीसारखा स्वच्छ आवाज येतो ना ते पाहा. मग सर्वांत वरचे छिद्र बंद करा. नवा स्वर स्वच्छ येतो का? येत असेल, तर तर्जनीने उघडणे-बंद करणे याचा सराव करा. स्वर समान अंतराने लयीत येऊ द्या—1, 2, 1, 2, 1, 2…

हे सहज जमल्यावर पहिली दोन छिद्रे बंद करा. आणखी नवा स्वर स्वच्छ येतो का? नसेल, तर बंद छिद्रातून हवा निसटत असण्याची शक्यता जास्त. तपासा आणि पुन्हा करा. दुसरे छिद्र उघडून-बंद करून स्वच्छ, सम लयीत सराव करा—1, 2, 1, 2… मग शिकलेले तीन स्वर क्रमाने वाजवा—1, 2, 3, 1, 2, 3… आवाज आणि अंतर सारखे येईपर्यंत सराव करा.

मग आणखी एक छिद्र बंद करून हेच करा. एकेक स्वर वाढवत सर्व छिद्रे बंद होईपर्यंत जा. कोणत्याही बंद छिद्रातून हवा गळू देऊ नका, नाहीतर स्वर स्वच्छ येणार नाही.

पकडीच्या पद्धती

पंडित पन्नालाल घोष यांची पकड

“योग्य पकड” हा हिंदुस्तानी बासरीवादकांतील चर्चेचा विषय आहे. मुख्यतः दोन विचारधारा आहेत. पंडित पन्नालाल घोष यांच्या शैलीचे अनुयायी बोटांच्या टोकांनी छिद्रे बंद करतात. त्यांच्या जुन्या छायाचित्रात ही पकड दिसते.

या पद्धतीचे समर्थक अनेक फायदे सांगतात. बोटांवर अधिक नियंत्रण मिळून कोमल स्वर वाजवणे सोपे होते. खालच्या हाताच्या करंगळीने सातवे छिद्र बंद करता येते, त्यामुळे मींडचा पल्ला वाढतो, असाही दावा आहे.

दुसरी पद्धत पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शैलीच्या अनुयायांची. यात बोटांच्या मधल्या भागाने छिद्रे झाकतात; मात्र प्रत्येक हाताचे तिसरे छिद्र बोटाच्या टोकाने बंद करतात. हरिजींच्या छायाचित्रात ही पकड दिसते. तिचेही अनेक फायदे सांगितले जातात. अनेकांना, विशेषतः लांब बोटे असणाऱ्यांना, ती अधिक नैसर्गिक वाटते. गमक किंवा सलग मींडही सोपी होते.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची पकड

इथे दोन्ही लोकप्रिय पद्धती स्पष्ट केल्या आहेत. कोणती आवडते ते तुम्ही ठरवा; पण यांपासून वेगळी पकड बनवताना सावध राहा. विशेषतः पाश्चात्त्य फ्लूटसारखी पकड टाळावी. तशी धरल्यास बासरीवर वेगवान स्वररचना वाजवणे कठीण होते. पाश्चात्त्य फ्लूटच्या कळा ठरावीक रीतीने दाबतात आणि कोमल स्वर वेगळ्या पद्धतीने वाजवतात. बासरीतील अर्धस्वरांच्या पद्धतीमुळे वरच्या पकडींपैकी एक पाळणे महत्त्वाचे आहे. पकडीचा निर्णय कायम सोबत राहतो, म्हणून काळजीपूर्वक विचार करा.