आवश्यक साधने — तानपुरा

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

तानपुरा

बासरीचा उगम मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाला. म्हणून ती अतिशय साधी आहे. लोकसंगीतातील तिची लोकप्रियता या साधेपणातून समजते. उत्तर भारतातील गावाकडचा मुलगा स्थानिक बांबूपासून बासरी बनवून रानात नेतो आणि दिवसभर लोकधुनी वाजवतो; त्याला आणखी साधने कशाला?

साधे लोकसंगीत, सुगम किंवा चित्रपटसंगीत वाजवायचे असेल, तर सुरातली चांगली बासरी पुरेशी आहे. पण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकायचे असेल, तर काही साहाय्यक साधने नक्कीच लागतील. काही आवश्यक आहेत, तर काही मी सुचवतो.

तानपुरा हा भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्तानी आणि कर्नाटक, दोन्ही पद्धतींतील आवश्यक साथीचे वाद्य आहे. त्याला तंबोरा, तंबुरा अशीही नावे आहेत.

तानपुरा कलाकारासाठी नादाची पार्श्वभूमी तयार करतो. तात्त्विकदृष्ट्या तो वैश्विक नादाचे, ॐचे प्रतीक आहे. संपूर्ण मैफलीत त्याचा नाद स्वरांचा संदर्भ देतो. हिंदुस्तानी संगीतातील सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे सतत तानपुऱ्याशी स्वर अचूक जुळवणे, असे बहुतेक श्रेष्ठ कलाकार सांगतील.

तानपुरा म्हणजे एका अर्थाने साधी नादपेटी. मोठा पोकळ भोपळा अनुनाद निर्माण करतो. त्यासाठी विशिष्ट जातीचा भोपळा घेतात, उन्हात आणि उष्णतेत वाळवून पोकळ करतात. मग पोकळ लाकडी दांडीला जोडतात.

पारंपरिक तानपुरा

नादाची गुणवत्ता बऱ्याच अंशी ब्रिजवर अवलंबून असते—भोपळ्याकडचा पांढरा भाग, ज्यावर तारा टेकतात. त्याच्या पृष्ठभागाचा कोन आणि वक्रता नादावर मोठा परिणाम करतात. जवारी वाढवण्यासाठी अनेकदा तारांखाली छोटे धागे ठेवून त्या ब्रिजपासून किंचित उचलतात.

पारंपरिक तानपुऱ्याला चार तारा असतात. मधल्या दोन सा, चौथी एक सप्तक खालचा मंद्र सा आणि पहिली रागानुसार प, म किंवा नि या स्वरावर लावतात. हल्ली अनेक कलाकार इतर स्वररचनाही वापरतात. काही पाच किंवा सहा तारांच्या तानपुऱ्यात ग–प–सा–सा–सा किंवा प–नि–सा–सा–सा असे अपारंपरिक स्वर लावतात.

वाहून नेणे सोपे व्हावे म्हणून अलीकडे लहान तानपुरा तयार झाला, ज्याला इंस्ट्रुमेंटल तानपुरा म्हणतात. त्याला भोपळा नसतो. पूर्ण पोकळ लाकडी शरीरच नादपेटीचे काम करते. कधी नाद अधिक टिकवण्यासाठी गिटारप्रमाणे गुंडाळीच्या तारा वापरतात.

रॅडेल इलेक्ट्रॉनिक तानपुरा

बहुतेक गायक सरावात स्वतः तानपुरा वाजवतात. बासरीवादकाला ते शक्य नाही. सुदैवाने आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक तानपुरे उपलब्ध आहेत. काही बॅटरीवरही चालतात. अनेकांचा आवाज खऱ्या तानपुऱ्याच्या अगदी जवळचा असतो. रॅडेलचे माएस्ट्रो-एस स्टिरिओ मॉडेल उत्तम पर्यायांपैकी एक. त्याचा नाद वास्तववादी असून दोन तानपुऱ्यांच्या मोडमध्येही वापरता येतो. तो बॅटरीवरही चालतो. रागिणी डिजिटल तानपुरा हे आणखी एक लोकप्रिय मॉडेल.

रागिणी डिजिटल तानपुरा

इलेक्ट्रॉनिक तानपुरा घेताना डिजिटल प्रकार घ्या. ॲनालॉग तानपुरे गरम झाल्यावर स्वर बदलण्यासाठी ओळखले जातात.