विचार

नववर्षाचे संकल्प आणि ते हसू :)

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

· प्रसाद भंडारकर

तुम्ही माझ्यासारखे असाल, तर नववर्षाचा एखादा संकल्प केला असेल. खरं तर तीन-चार केले असतील.

आणि ते इतरांना सांगताना चेहऱ्यावर एक हसू असेल—असे हसू, ज्यावरून समोरच्याला कळते की संकल्पांची चर्चा तर करता आहात, पण पहिले दोन-चार दिवस उलटल्यावर ते पाळाल यावर तुमचाच मनातून विश्वास नाही.

असे का होते?

अलीकडे वाचलेली दोन पुस्तके उत्तराची दिशा दाखवतात. हे उत्तर संगीताच्या विद्यार्थ्यांना जितके लागू आहे, तितकेच स्वतःमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडवू पाहणाऱ्या प्रत्येकाला लागू आहे.

Switch — Chip Heath and Dan Heath

The Happiness Hypothesis — Jonathan Haidt

पहिल्या पुस्तकाचे नाव अगदी योग्य आहे—स्विच — हाउ टू चेंज थिंग्ज व्हेन चेंज इज हार्ड, म्हणजे बदल कठीण असताना तो कसा घडवावा. या पुस्तकाने काही संकल्पना आणि सिद्धांत दुसऱ्या पुस्तकातून घेतले आहेत. तेही मी अलीकडेच वाचले—हॅपिनेस हायपॉथिसिस.

दोन्ही पुस्तके मानवी वर्तनाची एक साधी पण प्रभावी चौकट मांडतात. तिचा सारांश असा:

मानवी मेंदूच्या उत्क्रांतीमुळे आपल्या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वाला दोन बाजू आहेत.

मेंदूचा जुना भाग जगण्यासाठीच्या “लढा किंवा पळा” या उपजत प्रेरणांसाठी आनुवंशिकरीत्या घडलेला आहे. ही बाब आपल्यात आणि इतर प्राण्यांत समान आहे. अशा निर्णयांवर खूप विचार करता येत नाही. वाघ हल्ला करत असताना एखादी व्यक्ती लढण्याचे आणि पळण्याचे फायदे-तोटे मोजते आहे, अशी कल्पना करा! म्हणून हा भाग पूर्ण माहितीच्या आधारे निर्णय घेण्यापेक्षा आवेगाने, झटपट निर्णय घेण्यासाठी बनलेला आहे.

मग नवा मेंदू, म्हणजे निओकॉर्टेक्स येतो. हे आपल्या मेंदूतील पुढचे भाग आहेत, जे बहुतांश प्राण्यांत नसतात. म्हणजे हा माणसाचा वेगळेपणा आहे. वर्षानुवर्षांच्या विकासातून हा भाग विचार करून तर्कशुद्ध, माहितीपूर्ण निर्णय घेऊ लागला.

पुस्तके मनाच्या या दोन बाजूंची तुलना हत्ती आणि त्याच्या स्वाराशी करतात. हत्ती म्हणजे आवेगी मन आणि स्वार म्हणजे तर्कशुद्ध मन. स्वार विचारपूर्वक निर्णय घेतो आणि हत्तीला दिशा देण्याचा प्रयत्न करतो.

स्वार स्वभावतः दूरचा विचार करतो. तो म्हणतो, “प्रसाद, नव्या वर्षात थोडे वजन कमी केलेस, तर आरोग्यासाठी चांगले होईल—कदाचित दिसशीलही अधिक छान.”

पण हत्तीचे वेगळेच विचार असतात. पहिले काही दिवस तो स्वाराचे ऐकतो. मग एखाद्या संध्याकाळी व्यायामाऐवजी टेलिव्हिजन पाहावेसे “वाटते”. किंवा चॉकलेटची अख्खी वडी खावीशी “वाटते”.

स्वाराचे नियंत्रण सुटते आणि दोघेही वाट चुकतात. लक्षात ठेवा, हत्ती स्वारापेक्षा कितीतरी मोठा आहे.

शिवाय दोघांनाही भूतकाळ आठवतो. मागच्या वर्षी आणि त्याआधीही असेच झाले होते, हे त्यांना ठाऊक असते. त्या हसण्यामागचे कारण हेच. संकल्प योग्य आणि तर्कशुद्ध आहे, हे स्वाराला माहीत असले, तरी तुम्ही—म्हणजे ते दोघे—दोन दिवसांत तो सोडून द्याल, हेही दोघांना माहीत असते.

मग नववर्षाचे संकल्प निरर्थक आहेत का? तसे नाही. स्विच पुस्तकात अशी चौकट आहे, जिच्या मदतीने स्वार, हत्ती आणि त्यांचा मार्ग या तिन्हींवर काम करता येते.

मी नववर्षात थोडे वजन कमी करण्याचा संकल्प केला, तर असे करेन:

स्वाराला दिशा देईन

  • जमलेल्या गोष्टी शोधेन. गेल्या वर्षी मूळ योजना पूर्ण पाळली नाही, तरी २० ऐवजी १० पौंड कमी झालेच. त्यात काय उपयोगी पडले?
  • महत्त्वाच्या कृती ठरवेन. ट्रेडमिलवर धावणे जमले नाही, पण टेनिस खेळणे जमले.

हत्तीला प्रेरित करेन

  • त्यातील आनंद शोधेन. टेनिसच्या चेंडूला जोरदार फटका मारताना मजा येते ना? वजन घटवण्यापेक्षा त्या आनंदासाठी खेळेन.
  • बदल लहान करेन. रोज सकाळी सहा वाजता ९० मिनिटे खेळण्याऐवजी १५ मिनिटे खेळेन.

मार्ग सुकर करेन

  • परिसरात बदल करेन. टेनिसचे रॅकेट आणि बूट गाडीत ठेवेन, म्हणजे वाटेल तेव्हा खेळता येईल.
  • सवयी लावेन. एखादी गोष्ट नियमित २१ दिवस केली की सवय लागते, असे म्हणतात.

हे सगळे संगीताच्या रियाजालाही किती लागू आहे! आपण कितीदा म्हणतो की पहाटे उठून बराच वेळ रियाज करायचा, आणि मग सकाळी झोपून राहतो; उरलेला दिवस अपराधी वाटत राहते. नियमित रियाजासाठी ही चौकट कशी वापरता येईल, याचा विचार करा.