
आपले आदर्श
मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.
· प्रसाद भंडारकर
आज वर्गात आम्ही राग अहिर भैरवचा सराव करत होतो. या गटातील विद्यार्थ्यांची अडचण अशी की राग आणि त्यातील विस्तार ते चांगला वाजवतात, पण संगीत अधिक समृद्ध करणारे अलंकार विसरतात. आज आम्ही अलंकारांवर काम करायचे ठरवले. त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे एखादी परिचित धून मूळ गायकाने किंवा वादकाने सादर केली आहे तशीच वाजवणे.
अहिर भैरवचा सराव सुरू असल्यामुळे आम्ही पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांचे सुंदर भजन निवडले—राम का गुणगान करिए. म्हणजे, प्रभू रामाच्या गुणांचे स्तवन करा.
या रचनेला माझ्या मनात खास स्थान आहे. मला आठवते, ऑगस्ट १९८८ मधला एक शनिवार होता. मी पहिल्यांदा हरिजींच्या घरी गेलो आणि मला बासरी शिकवण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की ते नवशिक्यांना शिकवत नाहीत आणि मला काहीतरी वाजवायला सांगितले. मी हेच भजन वाजवले होते.
आज वर्गात हे भजन वाजवत असताना माझ्या आणि आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांचे किती मोठे स्थान आहे, याची जाणीव झाली. लता मंगेशकर नसलेल्या जगाची कल्पना करा. किंवा भीमसेन जोशी नसलेल्या जगाची. आपण या दिग्गजांच्या काळात जन्मलोच नसतो तर?
मग आपल्याला ऐकायला मिळाल्याच नसत्या अशा त्या सगळ्या सुरावटींचा विचार करा. किंवा त्या दुसऱ्या कुणीतरी गायल्या असत्या, ज्यांना शुद्ध सुरांचे ते दैवी सामर्थ्य लाभले नसते.
ते जग कसे असते?
पंडित हरिप्रसाद चौरसिया दुसऱ्या काळात जन्मले असते तर काय झाले असते, याची कल्पना करा…
मला तरी बासरी शिकण्याची प्रेरणा मिळाली नसती. आज बासरीमुळे माझे आयुष्य किती समृद्ध झाले आहे! माझे आयुष्य अपुरे राहिले असते आणि मला त्याची जाणीवही झाली नसती. कठीण काळातून तरून जायला आणि चांगले क्षण अधिक आनंदाने जगायला मदत करणारी ही गोष्टच अस्तित्वात नसती.
कदाचित इतर बासरीवादक बासरीतील उपजत सामर्थ्य आणि भावपूर्णतेचा उपयोग करण्याऐवजी इतर संगीतकारांची नक्कल करत राहिले असते. बरेचसे संगीत यांत्रिक झाले असते.
लताजी, भीमसेनजी, हरिजी किंवा झाकीर हुसेन यांच्यासारखे आदर्श रोज जन्माला येत नाहीत. पण जेव्हा येतात, तेव्हा आपल्या क्षेत्राला अशा उंचीवर नेऊन ठेवतात की अनेक पिढ्यांना तिथवर पोहोचण्याची प्रेरणा मिळते. आपले आयुष्य केवळ त्यांच्या संगीतानेच नव्हे, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सर्वांच्या संगीतानेही समृद्ध होते.
आपण संगीतकार असो वा नसो, या आदर्शांबद्दल कृतज्ञ राहण्याची आपल्या सर्वांकडे अनेक कारणे आहेत.