विचार

प्रतिभेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते का?

मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद.

· प्रसाद भंडारकर

प्रतिभेला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते का?

आपण जन्मतः प्रतिभावान असतो, की परिस्थिती आणि प्रयत्न आपण कोण होणार हे ठरवतात?

तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन हे एकमेवाद्वितीय संगीतकार आहेत, हे आपल्यापैकी बहुतेकांना मान्य असेल. वाद्यावरचे त्यांचे प्रभुत्व तर अद्भुत आहेच, पण तबल्यातून काय करता येईल याविषयीची त्यांची कल्पनाशक्ती आणि हाताळणीही अतुलनीय आहे.

मुख्य प्रश्न असा—झाकीर हुसेन जन्मजात प्रतिभावान आहेत, की परिस्थितीने त्यांना घडवले? त्यांचे वडील स्वतः आपल्या पिढीतले दिग्गज होते. त्यामुळे उत्कृष्ट तबला वाजवण्यासाठी योग्य जनुके त्यांना जन्मतः मिळाली, की लहानपणी वडिलांनी अतिशय काळजीपूर्वक शिकवल्यामुळे ते असे घडले, हा प्रश्न साहजिकच पडतो.

अलीकडे मी दोन पुस्तके वाचली. प्रतिभावान संगीतकार घडण्यामागच्या काही व्यापक प्रश्नांची उत्तरे ती शोधतात.

Talent Is Overrated — Geoff Colvin

पहिले पुस्तक जेफ कॉल्विन यांचे टॅलेंट इज ओव्हररेटेड — व्हॉट रिअली सेपरेट्स वर्ल्ड-क्लास परफॉर्मर्स फ्रॉम एव्हरीबडी एल्स. मोझार्ट, टायगर वुड्स, वॉरेन बफेट यांच्यासारख्या असामान्य व्यक्तींच्या प्रतिभेचे आपल्याला कौतुक वाटते. पण परिस्थिती आणि मानसिक जडणघडण यांच्या अचूक संयोगातूनच ही माणसे घडली, याचे पुरावे आहेत, असा लेखकाचा युक्तिवाद आहे.

कॉल्विन यांच्या मांडणीतील महत्त्वाचे मुद्दे असे:

  • कोणत्याही क्षेत्रात प्रभुत्व मिळवण्यासाठी १०,००० तासांचा सराव लागतो. या आकड्यात काहीतरी विशेष आहे. इतक्या सरावानंतर मेंदूतील जोडण्या जणू अधिक चांगले काम करण्यासाठी नव्याने जुळतात.
  • या १०,००० तासांतील प्रयत्न सर्वसाधारण नसतात. कॉल्विन त्याला “डिलिबरेट प्रॅक्टिस”, म्हणजे उद्देशपूर्वक केलेला सराव म्हणतात. आईवडिलांनी सांगितलेली कुठलीही मेहनत इथे अभिप्रेत नाही. २०, ३० किंवा ४० वर्षे कष्ट करणाऱ्यांची आपल्यात कमतरता नाही. इथे अतिशय नेमक्या प्रयत्नांबद्दल बोलत आहोत, जे त्या क्षेत्रातील उणिवांवर सतत काम करून मर्यादा पुढे नेतात.
  • उत्कृष्ट कामगिरी करणारी माणसे स्वतःच्या कामगिरीचा विचार आणि विश्लेषण करतात, उणिवा शोधतात आणि त्यासाठी खास सराव आखतात. उदाहरणार्थ, टायगर वुड्स एका सरावात बंकरमधून चेंडू शेकडो वेळा मारत, जरी प्रत्यक्ष स्पर्धेत चेंडू तिथे जाण्याचे प्रसंग क्वचित येत असतील.
  • उणिवा ओळखून त्यांच्यासाठी उद्देशपूर्वक सराव आखण्यात चांगल्या प्रशिक्षकाची—गुरूची!—भूमिका कमी लेखता येत नाही.
  • असा सराव कष्टदायक आणि नेहमीच्या दृष्टीने कंटाळवाणा असतो. बंकरमधून शेकडो वेळा चेंडू मारणे कंटाळवाणेच असणार. मग टायगर वुड्स रोज तेच का करतात? त्यांना कोणी ओळखत नव्हते, त्या काळातही त्यांनी हा सराव केला असेल. त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी या त्यामागच्या प्रेरणा नक्कीच नाहीत.
  • म्हणून काही लोक प्रतिभावान का जन्मतात, हा मुख्य प्रश्न नाही. अशा कष्टदायक सरावातून जाण्याची मानसिक तयारी काहींमध्ये का असते आणि इतरांमध्ये का नसते, हा खरा प्रश्न आहे.

मग ही दोन पुस्तके भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रतिभेबद्दल काय सांगतात?

पुन्हा उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडे वळूया. ते आपल्या वडिलांचे पहिले पुत्र; त्यांना मोठ्या बहिणी आहेत. भारतीय संस्कृतीत याला असलेले महत्त्व पाहता वडिलांचे भरपूर लक्ष त्यांना मिळाले असेल. उस्ताद अल्लारक्खा हे उत्तम शिक्षक म्हणून ओळखले जातात. म्हणजे लहान झाकीरच्या जडणघडणीच्या काळात त्यांनी खूप उद्देशपूर्वक सराव आखला असेल.

सामान्य परिस्थितीत १०,००० तास म्हणजे साधारण दहा वर्षे. झाकीर यांनी एक-दोन वर्षांचे असताना तबला सुरू केला असेल, तर ११–१२ व्या वर्षी प्रभुत्वाची पातळी गाठली असेल. लक्षात ठेवा, हा सराव केवळ तबला वाजवण्यापुरता नसतो. उत्तम संगीत आत्मसात करणेही त्याचा भाग आहे. वडील श्रेष्ठ संगीतकार असल्यामुळे झाकीरना ते भरपूर ऐकायला मिळाले असेलच.

प्रत्यक्षात उस्ताद झाकीर हुसेन यांनी वयाच्या अकराव्या वर्षी उस्ताद अली अकबर खाँ यांच्याबरोबर पहिला सार्वजनिक कार्यक्रम केला होता.

The Happiness Advantage — Shawn Achor

दुसरे पुस्तक म्हणजे द हॅपिनेस ॲडव्हान्टेज. प्रतिभा हा त्याचा मुख्य विषय नसला, तरी लेखक शॉन एकर “टेट्रिस परिणाम” सांगतात. हार्वर्डमधील एका प्रयोगात विद्यार्थ्यांना टेट्रिस हा लोकप्रिय व्हिडिओ गेम सलग पाच-सहा तास खेळायला सांगितला होता. टेट्रिसमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या विटा पडद्यावर वरून खाली येतात. त्यांच्यात शक्य तितकी कमी मोकळी जागा राहील अशा त्या जमवायच्या असतात. खाली स्थिरावण्याआधी त्या फिरवून नीट बसवायच्या.

असे म्हटले जाते की पाच-सहा तास खेळल्यानंतर रोजच्या प्रसंगांतही आपण विटा जुळवण्याचा तोच विचार करू लागतो. उदाहरणार्थ, सुपरमार्केटमधील शेल्फवर पाव दिसले, की ते खेळाप्रमाणे अगदी सरळ ओळीत लावावेत असे मनात येते.

पुन्हा भारतीय संगीताकडे येऊया. विशेषतः पंजाब घराण्याच्या तबलावादकांत “चिल्ला” ही प्रसिद्ध परंपरा आहे. संगीतकार ४० दिवस एकांतात जातो आणि रोज १२–१४ तास फक्त संगीताचा सराव करतो. तबल्यात हा सराव मुख्यतः लयीच्या आकृतिबंधांचा—कायदे आणि रेले यांचा—असतो. हे टेट्रिसच्या तुकड्यांचे संगीतातील समकक्ष म्हणता येतील.

पाच-सहा तास टेट्रिस खेळल्याने मेंदूच्या आकलनात तात्पुरता बदल होत असेल, तर ४० दिवस रोज १२–१४ तास सरावाने काय होईल, याची कल्पना करा. कदाचित मेंदूतील जोडण्या आयुष्यभरासाठी बदलून या आकृतिबंधांबद्दल अतिशय संवेदनशील होतील. मग तुम्ही खूप चांगले तालवादक होऊन परताल, यात आश्चर्य काय?

याबद्दल खुद्द उस्ताद झाकीर हुसेन काय म्हणतात, ते ऐका.